पातूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशात अनेक मोठ्या मान्यवरांकडून महामानवाला अभिनवादन केलं जात आहे.
आज शुक्रवार दि. ६ डिसेंबरच्या सायंकाळी ६ वाजता पातूर शहरातील आंबेडकर अनुयायी संभाजी चौक येथील महात्मा फुले स्मारक येथे दाखल होण्यास सुरुवात झाली होती व महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्रिशरण,पंचशील ग्रहण केले.त्यानंतर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन देण्याकरिता पातूर शहरात कॅण्डल मार्च काढण्यात आला.हा मार्च महात्मा फुले स्मारक संभाजी चौक येथून सुरुवात होऊन मिलिंद नगर,चिरा चौक,भगत वेटाळ,कासार वेटाळ, तेली पुरा,विठ्ठल मंदिर,गुजरी लाईन,पाटील मंडळी,महात्मा फुले नगर,बाळापूर वेस होऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान भिमनगर येथे बाबसहेबांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन व सरणत्तय घेऊन समारोप करण्यात आला.यावेळी तान्हुल्यापासून वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील अनुयायांच्या पुतळ्याजवळ लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.तसेच सार्वजनिक भिमजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुतळ्यास पुष्पहार आणि पुष्पचक्र अर्पण केले.या कॅण्डल मार्च मध्ये अत्यंत शिस्तीने चालणारे हजारो अनुयायी पोलिसांना सहकार्य करताना पाहायला मिळाले.

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनपर कॅण्डल मार्चमध्ये नियोजनानुसार विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, धम्म बांधव अभिवादन करण्यासाठी सामील झाले होते. जवळपास एक ते दोन तास शिस्तबध्द पध्दतीने हा मार्च चालला असून वाहतुकीसोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पातूर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. कॅण्डल मार्च मध्ये सामील होणाऱ्या अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेता धम्म बांधवांना अभिवादन करणे सुकर होण्यासाठी सार्वजनिक भिमजयंती उत्सव समितीचे स्वप्निल सुरवाडे,निर्भय पोहरे,प्रविण पोहरे,मंगेश गवई,सुनिल सुरवाडे,बळीराम खंडारे,रुस्तम गवई,मेजर प्रमोद खंडारे,अमोल बागडे यांनी पोलिसांना उत्तम सहकार्य केले.