पातूर : ब्रह्माकुमारीज संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाशमणी जी यांच्या 18 व्या स्मृती दिवसानिमित्त संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाअंतर्गत दिनांक 25 ऑगस्ट रोजी स्थानिक ब्रह्माकुमारी सेवा केंद्रा मध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एकूण 44 रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षा राजयोगिनी ब्रह्माकुमारी लीना दीदी या असून प्रमुख अतिथी म्हणून डॉ. जयश्री कोकाटे, प्राचार्य, आयुर्वेद महाविद्यालय, पातुर, डॉ. भुस्कुटे, डॉ. संतोष दोडेवार, जी. एम. सी. एच. अकोला, मयुरी गायगोले, श्रीनिवास गव्हाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, पातुर, डॉ. अनिल लोखंडे, वैद्यकीय अधिकारी, पी. एस. सी., पातुर हे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्वच अतिथींनी रक्तदानाचे महत्त्व विशद करून जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ब्रह्माकुमारी लीना दीदी यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन दादी प्रकाशमणी जी यांच्या 18 व्या स्मृतिदिना प्रित्यर्थ संस्थेने एक लाख रक्त युनिट जमा करण्याचा संकल्प केला आहे व तो निश्चित पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच संस्थेद्वारा शिकवला जाणाऱ्या राजयोग मेडिटेशन चे जीवनातील महत्त्व स्पष्ट केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अतुल विखे यांनी तर आभार प्रदर्शन ब्रह्माकुमारी प्रभा दीदी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सर्व बी. के. भाऊ बहिणींनी सहकार्य केले.