पातुर (प्रतिनिधी): शहर सध्या पाणीटंचाईच्या संकटात असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आ.अमोल मिटकरी, जिल्हाध्यक्ष मो. बदरुजमा यांच्या मार्गदर्शनात पातुर नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील अनेक भागांमध्ये पंधरा ते वीस दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नाही. महिलांना, वृद्ध नागरिकांना व लहान मुलांना या टंचाईचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. Lपाईपलाईन फुटीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून, प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही त्यावर योग्य ती कारवाई केली जात नाही ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. पाणीपुरवठा विभागाचे कामकाज, नियोजन व नियंत्रण पूर्णतः अपयशी ठरत असल्याची तीव्र टीकाही निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनातील मुख्य मागण्या:

- पाणीटंचाई दूर करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करून त्वरित उपाययोजना करावी.
- वारंवार फुटणाऱ्या पाईपलाईनचे कायमस्वरूपी दुरुस्ती काम हाती घ्यावे.
- शहरातील प्रत्येक वॉर्डात आठवड्यातून किमान दोन वेळा पाणीपुरवठा नियमित करावा.
- पाणीटंचाईबाबत नागरिकांसमोर खुलासा करावा.
- दोषी अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर शिस्तभंगाची कारवाई करावी.
- ‘पाणी टंचाई नियंत्रण कक्ष’ स्थापन करावा.
राष्ट्रवादी काँग्रेसने प्रशासनाकडून तात्काळ सकारात्मक प्रतिसाद मिळावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी मा न.प.सदस्य मोहम्मद एजाज, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नईम खान, विद्यार्थी नेते मो फरहान अमीन, शेख नईम, मो.नजीब सेठ,कमरुज्जमा खान, शहजाद खान, भाजप तालुका चिटणीस राजूभाऊ उगले,नातीक शेख,अन्सार पहेलवान सैय्यद मुजम्मील आदी उपस्थित होते.