मनमानी कारभाराचा स्वपक्षीयांचाच आरोप
पातुर- येथील पंचायत समिती उपसभापती विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या अविश्वासासाठी कारण म्हणजे उपसभापतींकडून गेल्या काही दिवसांपासून मनमानी पद्धतीने कारभार सुरू असून आपल्याच पक्षाच्या पंचायत समिती सदस्यांना विश्वासात न घेता कारभार केल्या जात असल्याचे बोलले जात आहे.
पातुर पंचायत समितीमध्ये वंचितची सत्ता आहे, सभापती व उपसभापती दोघेही वंचितचे आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून उपसभापतींकडून आपल्याच पक्षाच्या पंचायत समिती सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही. त्यांना वाटेल तसे निर्णय ते घेत असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आलेगाव येथे एक भूमिपूजन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी सुद्धा पक्षाच्याच पंचायत समिती सदस्यांना बोलावले गेले नाही. याच दिवशी पक्षाच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांची सभा होती, या सभेची माहिती सुद्धा पक्षाच्या सदस्यांना दिली गेली नसल्याचा आरोप होत आहे. असे अनेक प्रकार घडल्याचे बोलले जात असून या मनमानी कारभाराला वैतागून उपसभापती विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.
मासिक सभेला सदस्यांची गैरहजेरी
पातुर पंचायत समितीची मासिक सभा 27 डिसेंबर रोजी पार पडली. या सभेमध्ये वंचितच्या सदस्यांनी गैरहजर राहणे पसंत केले. उपसभापती मनमानी पद्धतीने काम करीत असल्याने वैतागून सदस्यांनी मासिक सभेला गैरहजर राहणे पसंत केल्याचे बोलले जात आहे.
शासकीय योजनांमध्येही मनमानी
शासकीय योजनांमधून तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळायला हवा त्यासाठी सर्वच पंचायत समिती गणातील पात्र लाभार्थी निवडल्या जायला हवेत. परंतु उपसभापतींनी आपल्या मनमर्जीने जास्तीत जास्त लाभार्थी निवड आपल्या मर्जीने केल्याचा आरोप होत आहे.
कोट
मला माझ्यावर अविश्वास प्रस्ताव आणि माझ्या बाबत होत असलेल्या आरोपाबाबत काही माहिती नाही अशा प्रकारची काही माहिती झाल्यास मी माझे पक्ष श्रेष्ठींना सांगेल तसेच मी कोणतीही मनमानी केली नाही
इमरान खान मुमताज खान उपसभापती पंचायत समिती पातुर