पातुर (प्रतिनिधी) – कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी कार्यक्रम हा संपूर्ण भारतात उत्साहात साजरा केला जातो.याच पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांना गोपाल काला व दहीहंडीचे महत्त्व पटवून देण्यासाठी दरवर्षी श्रीमती लक्ष्मीबाई देशपांडे वरिष्ठ मराठी प्राथमिक शाळा कान्होबा चौक, पातूर येथे नुकतेच गोपाळकाला निमित्त ‘दहीहंडी उत्सव’ साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका कु. वंदना सरप तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक व बहुसंख्य पालक वर्ग या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका कु. वंदना सरप यांनी गोपाल काला निमित्त भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण केले. या कार्यक्रमाला नर्सरी ते 4 थी पर्यंतचे बहुतेक विद्यार्थी राधा – कृष्ण यांच्या वेशभूषेत तयारी करून आले होते आणि हेच या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.राधा कृष्णाच्या वेशभूषेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेतील शिक्षकांनी जल्लोषात स्वागत केले.कार्यक्रमाच्या शेवटी विदयार्थ्यांनी मनोरे रचून दहीहंडी फोडली व गवळण गाण्यांवर हर्ष- उल्हासात नृत्य सादर केले.शेवटी सर्व विद्यार्थ्यांना गोपाळकाला प्रसादाचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाला मुख्याध्यापिका कु.वंदना सरप यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्य महिला पालक उपस्थित होते.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
