पातूर प्रतिनिधी :- साप हा अन्नसाखळीतील घटकांपैकी एक महत्त्वाचा प्राणी आहे.पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक प्राणी आणि त्याचे अस्तित्व महत्त्वाचे आहे.साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे त्यामुळे त्याला न मारताना,इजा न पोचवता त्याचे संरक्षण होणे गरजेचे आहे.हाच हेतू समोर ठेवून नागपंचमीचे औचित्य साधून एज्युविला पब्लिक स्कूल,पातूर येथे सापांविषयी जनजागृती करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात सर्पमित्रांचा यथोचित सन्मान करून करण्यात आली.सर्पमित्र स्वप्नील सुरवाडे व प्रमोद कढोणे यांनी आपल्या अमूल्य मार्गदर्शनातून विविध प्रकारच्या सापांची माहिती दिली

त्याचबरोबर आपल्या परिसरात आढळणाऱ्या विषारी व बिनविषारी सापांची ओळख करून दिली.त्यांच्याविषयी असणाऱ्या भ्रामक कल्पना, अंधश्रद्धा यावर प्रकाश टाकला.सापांविषयी असलेली अनावश्यक भीती आणि गैरसमज दूर करून, त्यांच्याशी सुरक्षितपणे कसे वागावे,सर्पदंश झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी तसेच सर्पमित्रांची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी देखील या कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि सर्पमित्रांना विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी,मुख्याध्यापिका विद्या गाडगे तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता शिक्षिका स्नेहल काळपांडे,नेहा अत्तरकार,नीता ढोणे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.