अजय कवडे यांच्या पुढाकाराने :- पातूर तालुक्यातील गावागावांत धरणे.
पातूर :- शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा व गावातच आरोग्याच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, गोरगरिबांना मोफत शिक्षण मिळावे, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, अशा मागण्या सरकार दरबारी मांडण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अजय दगडू कवडे यांनी धरणे आंदोलनाचे हत्यार हाती घेतले आहेत. पातूर तालुक्यातील गावांमध्ये ‘गाव तिथे भाववाढ धरणे’ ही संकल्पना घेऊन दि. २३ सप्टेंबरपासून आंदोलन करण्यात येणार आहे.
पातूर तालुक्याचे तहसीलदार तथा दंडाधिकारी यांना अजय कवडे यांनी निवेदनाद्वारे आंदोलनाबाबत माहिती दिली असून, आंदोलनस्थळी शासनाकडून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. विदर्भात सर्वाधिक पेरा असलेल्या सोयाबीनला कवडीमोल भाव असल्याने शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण आहे. शासनाकडून केवळ शेतकऱ्यांची आतापर्यंत फसवणूकच झाली आहे. ग्रामीण भागातील सुविधा कोणत्या आणि त्याकडे सरकार कसे दुर्लक्ष करते, शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव का नाही? असे प्रश्न घेऊन अजय कवडे यांनी पातूर तालुक्यात लोक संघर्ष यात्रा काढली. या यात्रेला शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, आता पातूर तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा यासाठी अजय कवडे आंदोलन छेडणार आहेत. सकाळी १०.०० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येणार असून त्या – त्या गावातील ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती कवडे यांनी दिली.
आंदोलनाचा पहिला टप्पा
२३ सप्टेंबर – चिचखेड
२४ सप्टेंबर – माळराजुरा
२५ सप्टेंबर – पास्टूल
२६ सप्टेंबर – पार्डी
२७ सप्टेंबर – कोठारी
शेतमालाला योग्य भाव, आरोग्य सुविधा, मोफत शिक्षण हे मूळ मुद्दे बाजूला ठेवले जातात आणि धर्माच्या, झेंड्यांच्या मुद्द्यांवर निवडणुका जिंकल्या जातात. राजकारणाचा हा डाव आता शेतकरी, शेतमजुर, बेरोजगार तरुणांच्या लक्षात आला आहे. गोरगरिबांच्या महत्त्वाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी गावागावांत शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे.
- अजय कवडे, चारमोळी, पातूर.
सोयाबीन ८०००/- रू.
कापूस १२०००/- रू. आणि तुरीला १२०००/- रू. हमीभाव मिळावा याकरिता कामाच्या व्यापातून शेतकरी हा शेती सोडून आंदोलनाला जिल्ह्यावर येऊ शकत नाही. पण व्यवस्थेवर शेतकऱ्यांचा दबाव असला तरचं मागण्या पूर्ण होतील. या करीता संपूर्ण गावाच्या सहभागाने गाव तिथे भाववाढ धरणे आंदोलनाचे नियोजन पातूर तालुक्यामध्ये करण्यात आले आहे.
- अक्षय राऊत, शेतकरी आंदोलक, अकोला.