पातूर : राज्यामध्ये महायुतीची एकहाती सत्ता आली. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ईव्हीएमचा घोटाळा (EVM Scam) असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीतर्फे (VBA) आंदोलन करण्यात आले.वंचित बहुजन युवा आघाडी पातूर शहराच्या वतीने पातूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,मिलिंद नगर या ठिकाणी ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवली.महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडल्या असून महायुतीने मोठे यश संपादन केले आहे. तर दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी व महाविकास आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. विरोधकांनी परभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले आहे. दरम्यान ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन तपासणी व पडताळणीचे अर्ज निवडणूक आयोगाकडे मोठ्या प्रमाणात पराभूत उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. ईव्हीएम मध्ये नेमका घोळ झालाय का याचे उत्तर पडताळणी नंतर समोर येणार आहे.वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएम विरोधात जनआंदोलनाची हाक दिली होती. यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्या टप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.3 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत राज्यात ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज दि. 7 डिसेंबर 2024 रोजी वंचित बहुजन युवा आघाडी पातूर शहरच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मिलिंद नगर येथे ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.सदर स्वाक्षरी मोहिमेला पातूर शहरासह तालुक्यातील जनतेने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत स्वाक्षरी करून आपला विरोध दर्शविला.सदर स्वाक्षरी मोहीम पातूर तालुका समन्वयक निर्भय पोहरे यांच्या मार्गदर्शनात वंचित बहुजन युवा आघाडीचे पातूर शहर अध्यक्ष प्रविण पोहरे यांनी राबविली.यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे पातूर तालुका प्रसिद्धी प्रमुख स्वप्निल सुरवाडे,मंगेश गवई,राजेंद्र पोहरे,बळीराम खंडारे,अविनाश पोहरे,राज पोहरे,प्रभात सुरवाडे,विजय बोरकर आदी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
