शिर्ला येथील प्रकार : उ.बा.ठा गटाचा पातूर पंचायत समितीवर मोर्चा
पातुर प्रतीनिधी : पातूर पंचायत समिती अंतर्गत शिर्ला येथील ग्रामस्थ मूलभूत सुविधा व शासकीय योजने पासून वंचित असल्याने उ.बा.ठा गटाच्या पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवार दि.३ जून रोजी पातूर पंचायत कार्यालयात मोर्चा काढला,

गेल्या अनेक महिन्यापासून
शिर्ला येथे मूलभूत सुविधा व शासकीय योजना मिळत नसल्याबाबत गावकऱ्यांनी पातुरच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या परंतु ग्रामस्थांच्या तक्रारीकडे गटविकास अधिकारी यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेता,तक्रारी हेतूप्रस्पर प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोप शिवसेनेच्या उ.बा.ठा.गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या शिवसेनेच्या उ. बा.ठा.गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेकडो ग्रामस्थसह महिला यांच्यासह थेट पातूर पंचायत समिती गाठले,यावेळी महिलांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्यावरील घाण कचरा,आणि विविध रोगराई आजार पसरल्या बाबत गटविकास अधिकारी सुनीता इंगळे यांना घेराव टाकून जाब विचारला शासकीय योजनाचा लाभ मिळण्यासाठी नागरिकांना जिथे तिथे पैसा द्यावा लागत असून,नागरिकांची आर्थिक लूट केली जात असल्याची खंत गटविकास अधिकारी यांच्याकडे व्यक्त केली.

शिर्ला ग्राम पंचायतचे सरपंच व सचिव मनमानी करीत असून,गटविकास अधिकारी नागरिकांच्या तक्रारीकडे आणि समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने पंचायत समिती प्रशासन आणि शिर्ला ग्राम पंचायत प्रशासनाचा यावेळी मोर्चेकरांनी निषेध केला तर पंचायत समितीच्या ढसाळ कारभारामुळे खंतही व्यक्त केली.शिर्ला ग्राम पंचायतला शासनाकडून ४० ते ५० लाख रुपयांचा निधी आलेला असून,घरकुल योजनेचा सर्वे सुद्धा सुरू आहे.या योजनेच्या दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांकडे मोबाईल नसल्यामुळे त्यांना कुठल्याच प्रकारची माहिती होत नाही,वास्तविक पाहता ग्राम पंचायत स्तरावरून गोरगरिबांच्या घरोघरी जाऊन सर्वे करावा जेणेकरून गोरगरिबांना घरकुल योजनेचा लाभ मिळेल,परंतु गटविकास अधिकारी सुनीता इंगळे यांचा कर्मचाऱ्यावर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे नागरिकांनी चार ते पाच महिन्यापासून केलेल्या तक्रारीवर कुठल्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.

आठ दिवसात समस्यांचा आणि तक्रारींचा निपटारा न केल्यास तीर्व आंदोलन करण्यात येईल असा इशारा मोर्चेकरांनी दिला आहे.मोर्चेकरा मध्ये युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख सागर रामेकर,शिवसेना उ.बा.ठा गटाचे तालुकाध्यक्ष रवींद्र मुर्तडकर पंचायत समिती सदस्य सुरज झडपे, शिवसेना उ.बा.ठा गटाचे शहरप्रमुख निरंजन बंड,परशराम उंबरकर,सचिन गीऱ्हे,कैलास बगाडे,आदीसह बहुसंख्य शिवसैनिक आणि शेकडो महिला पुरुष उपस्थित होते
वृत्त संकलनसाठी गेलेल्या पत्रकारावर दबाव !
मोर्चा संबंधी वृत्त संकलन करण्यासाठी पंचायत समिती मध्ये गेलेल्या पत्रकारावर गटविकास अधिकारी यांनी दबाव टाकून,पत्रकार यांना फोटो आणि शूटिंग काढण्यास मनाई करून अरेरावी करून उद्धट वागणूक दिल्याचा प्रकार समोर आला,
पत्रकारांचा अधिकार व जनतेला माहिती मिळण्याचा मूलभूत हक्क याला गालबोट लावणारी ही घटना अत्यंत निषेधार्ह असून, प्रशासनाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे हे वर्तन लोकशाही व्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचे मत व्यक्त करून स्थानिक पत्रकारांनी निषेध व्यक्त केला आहे.