पातुर प्रतीनिधी :- सामाजिक जीवनात भारतीयांचं नागांशी पूर्वीपासून दृढ नातं आहे. याच कारणांमुळे नागाची देवता म्हणून पूजा केली जाते. खरंतर आजही भारतातील सर्वाधिक लोकसंख्या ही उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. ज्यामुळे भारतात अगदी शेतीच्या अवजारांची पूजा करण्याचीही प्रथा आहे. तर नागाला शेतकर्यांचा मित्र म्हणून संबोधलं जातं असल्यामुळेही नागपंचमीची प्रथा आजही प्रचलित आहे.तसेच नाग पूजा करण्यामागे धार्मिक आणि सामाजिक कारण सुद्धा आहे. प्राचीन काळापासून भारतात चालत आलेल्या संपन्न प्रथा परंपरेचे ज्ञान आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांना अवगत व्हावे, याच पार्श्वभूमीवर दिनांक 09 ऑगस्ट शुक्रवार ला श्रीमती लक्ष्मीबाई देशपांडे वरिष्ठ मराठी प्राथमिक शाळा कान्होबा चौक पातुर येथे नागपंचमी सण उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मानवी जीवनात नागांचे अनन्य साधारण महत्व आहे हे पटवून दिले व नागांच्या विविध प्रजातींची विद्यार्थ्यांना माहिती दिली. यानंतर शाळेतील अनेक विद्यार्थ्यानी नागदेवतेचे चित्र रेखाटले व त्या रेखाटलेल्या नागदेवतेच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका कु.वंदना सरप यांनी केले. यानंतर शालेय परिसरातील झाडांवर झोके बांधून विद्यार्थी व शिक्षकांनी उंच उंच झोके घेत झुल्यांचा मनमुराद आनंद लुटला.याप्रसंगी शाळेतील देशमुख मॅडम, लखाडे मॅडम, डाखोरे सर, सानप सर, सिरसाट सर, राठोड सर, घोरे सर तसेच कॉन्व्हेंटच्या वानखडे टीचर, धोटकर टीचर, करंगाळे टीचर, तसेच पोहरेताई, तिडकेताई यांचे सह शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
