पातूर : पातूर शहरातुन एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळून नेल्याची घटना शुक्रवारी १३ सप्टेंबर रोजी समोर आली आहे.
याप्रकरणी पातूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, पातूर शहरातील एका भागात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सदर मुलीचे आईवडील अत्यंत गरीब परिस्थितीतील असून पोटाची खळगी भरण्यासाठी हाताला मिळेल ते काम करून आपल्या परिवाराचे पालनपोषण करतात त्यामुळे मुलांकडे फारसे लक्ष देणे होत नसल्याने शुक्रवारी १३ सप्टेंबर रोजी एका अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फुस लावून पळवून नेल्याचे समोर आले आहे. या संदर्भात पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला, परंतु कोणतीही माहिती मिळाली नाही, अखेर पीडित मुलीच्या पालकांनी पातूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार शुक्रवार १३ सप्टेंबर रोजी एका अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेस आज दहा दिवस ओलांडून झाले आहेत तरीसुद्धा मुलीबद्दल काहीच माहिती पोलिसांकडून मिळाली नसल्याने त्या गरीब मातापित्यांच्या काळजाची दयनीय घालमेल होत असून पोलीस प्रशासन मात्र याबाबत कमालीचे उदासीन असल्याचे भासत आहे.
हल्लीच्या काळात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या, एकतर्फी प्रेमवीरांकडून शिकवणी वर्गाला शाळकरी मुलींचा पाठलाग करून त्रास देऊन त्यांना मानसिक व शारीरिक ईजा करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून स्त्री सुरक्षित रहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून दामिनी पथक निर्माण करण्यात आले आहे, व त्यामुळे अशा असामाजिक तत्त्वांना बऱ्यापैकी आळा बसला असून आपण या “आंशिक विकृत” समाजामध्ये महिलांना बिनधास्तपणे जगण्याची आशा या ‘दामिनीच्या रणरागिणी’ मुळे मिळाली आहे.मात्र काही प्रमाणात अजूनही दामिनी केवळ त्यांना मिळालेल्या शासकीय वाहनावर फिरून आपल्या ड्युटी पॉईंट वर सेल्फी घेऊन कर्तव्य करीत असल्याचा बनाव करीत इन्स्टाग्रामवर रील बनवत असल्यामुळे अजूनही काही ठिकाणी महिला,मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर पडला आहे,त्यामध्ये पातूर शहर पोलीस स्टेशन अपवाद नाही असे म्हटले तर काही चुकीचे ठरणार नाही ! पातूर शहरात तीन मुख्य चौक आहेत व त्या तीनही चौकांमधून शाळकरी मुलींची वहिवाट असते,नेमकी शाळा सुटायच्या वेळेला या तीन चौकांमध्ये टवाळखोर मजणूंचा भाडीमार असून यांच्या खोचक नजरा व “कॉमेंट” ला मुली/महिलांना सामोरे जावे लागते. त्याच अनुषंगाने या तीनही चौकांमध्ये पोलीस वाहतूक नियंत्रण कर्मचारी कधीच हजर नसतात त्यामुळेदेखील अशे असामाजिक तत्व फोफावत आहेत ही बाब फारच गंभीररित्या पोलीस प्रशासनाने घेण्याची गरज आहेच,मात्र १३ सप्टेंबर रोजी एक १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता आहे आणि आजपावेतो तिचा काहीच थांगपत्ता लागला नसून पोलीस केवळ कागदोपत्री शोध घेत आहेत की अक्षरशः पीडितांसोबत ऑफिस-ऑफिस खेळून त्यांचा “मूसद्दीलाल” करीत आहेत का?
असा सवाल पातूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला पडला तर काही चुकीचे नाही.याकडे संबंधित प्रशासन व स्वतः पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
