पातूर–बाळापूर मार्गावर आय.टी.आय. कॉलेजसमोर सोमवार सकाळी एक भीषण अपघात झाला.ट्रक आणि ऑटो यांच्यात समोरासमोर धडक होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ९ वाजता पातूरकडून अंबाशी गावाकडे जात असलेला प्रवासी ऑटो (क्रमांक एमएच ३० बीसी २०७१) याच्या मागून येणाऱ्या ट्रकने (क्रमांक एमएच १८ बीजी ८४९४) ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात जोरदार धडक दिली.

त्यामुळे ऑटो समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकला (क्रमांक एमपी ०९ एचएच ४४२६) जाऊन धडकला. धडक इतकी जोरदार होती की ऑटोचे अक्षरशः तुकडे झाले.

या अपघातात पियुष रविंद्र चतरकर (वय अंदाजे १३, रा. सिंधी कॅम्प, अकोला) आणि लिलाबाई ढोरे (वय अंदाजे ५०, रा. लाखनवाडा) यांचा जागीच मृत्यू झाला.
तर सुरेंद्र चतरकर (४५), रविंद्र चतरकर (५२), रूपचंद वाकोडे (५०), प्रमिलाबाई वाकोडे (६५) हे गंभीर जखमी झाले आहेत.
स्थानिक नागरिक आणि पातूर पोलिसांच्या मदतीने जखमींना १०८ रुग्णवाहिकेद्वारे अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून, पुढील तपास पातूर पोलीस करत आहेत.