प्रतिनिधी पातुर :- शिक्षिकांचे शोषण केल्या प्रकरणी पातूर येथील एका संस्थेचा सचिव सैय्यद कमरुद्दीन सैय्यद इस्माईल याने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज पहिले जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.डी. क्षीरसागर यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. आपल्याच शिक्षण संस्थेतील शिक्षिकांचे मानसिक व शारिरिक शोषणाचा प्रयत्न केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. सैय्यद कमरुद्दीन सैय्यद इस्माईल सचिव असलेल्या शिक्षण संस्थेतील शिक्षिकांनी अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांकडे तक्रार केली होती. त्यानंतर दोन शिक्षिकांनी पातूर पोलिस ठाण्यात ११ फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती. पोलिसांनी
संस्था सचिव सैय्यद कमरुद्दीन सैय्यद इस्माईल याच्यासह चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम ७४,७५, २९६,३०८ ३५१(३), ३५१ (५) (२), ३५१(२), नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.अटकपूर्व जामीन अर्ज मिळावा म्हणून आरोपीने न्यायालयात अर्ज दाखल केला असता मंगळवारी अटक पूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली.न्यायालयात सरकार पक्ष व पीडित महिलांच्या वतीने वकिलांनी जामीन अर्जाला विरोध केला,यावेळी त्यांनी आरोपीचा पूर्वइतिहास न्यायालयासमोर मांडला. सरकार पक्षाच्या वतीने ॲड राजेश अकोटकर यांनी बाजू मांडली.पीडित महिलांच्या वतीने ॲड आशिष देशमुख यांनी बाजू मांडली.