पातूर प्रतिनिधी :- पातूर शहरात दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी शनिवारी रात्री एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. पातूर-तुळजापूर रस्त्यालगतच्या गावठाण परिसरात एका ६० वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.शनिवारी रात्री सुमारे नऊच्या सुमारास काही स्थानिक नागरिक गावठाणातून जात असतांना त्यांना रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती हालचाल न करता पडलेली दिसली.अधिक जवळ जाऊन पाहिल्यावर ती व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली.त्यांच्या पोटावर धारदार शस्त्राने खोल वार करण्यात आले होते. ओळख पटल्यानंतर हे मृतदेह सैय्यद जाकीर सैय्यद मोहिद्दीन (वय ६०,राहणार मुजावरपुरा,पातूर) यांचा असल्याचे निष्पन्न झाले.घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी रात्रीच्या अंधारातही संपूर्ण गावठाण आणि परिसराची कसून पाहणी केली. घटनास्थळावरील परिस्थिती आणि मृताच्या शरीरावरील जखमा पाहता ही हत्या थंड डोक्याने आणि नियोजनपूर्वक करण्यात आली असावी,असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.या घटनेनंतर पातूर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र,या हत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी हत्येच्या कारणांचा शोध घेण्यासाठी विविध शक्यतांवर तपास सुरू केला आहे.मृतकाचे कोणाशी वैयक्तिक वाद होते का,ही हत्या सूडबुद्धीतून झाली आहे की यामागे आर्थिक किंवा कौटुंबिक कारण आहे,याचा पोलीस कसून तपास करत आहेत.एका शांत गावात अचानक झालेल्या या क्रूर हत्येमुळे नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थता पसरली आहे.गावकरी या घटनेमुळे हादरले असून,परिसरात शोककळा पसरली आहे.पातूर पोलिसांनी तपासाला गती दिली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे सुरू केले आहे.यासोबतच,मृताच्या कुटुंबीयांची,जवळच्या व्यक्तींची आणि काही संशयितांची प्राथमिक चौकशी करण्यात येत आहे. तसेच,मृताच्या मागील काही दिवसांतील संपर्क तपशील (कॉल डिटेल्स) देखील तपासले जात आहेत. पोलिसांनी या प्रकरणात कसलीही दिरंगाई न करता आरोपीला लवकरात लवकर शोधून काढण्याचा निर्धार केला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह,अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि पातूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाच्या तपासासाठी एक विशेष तपास पथक (एसआयटी) तयार करण्यात आले आहे.या पथकाला २४ तासांच्या आत तपासाचा प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.मृतक सै. जाकीर हे गावातील एक जुने आणि शांत स्वभावाचे व्यक्ती होते.गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,त्यांचा कुणाशीही वाद किंवा भांडण नव्हते.त्यामुळे त्यांची हत्या का झाली,याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.या घटनेनंतर पोलिसांनी पातूर आणि आसपासच्या गावांमध्ये गस्त वाढवली आहे.तसेच,परिसरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर आणि टोळ्यांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. या घटनेमुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता नागरिकांना पोलिसांकडून जलद आणि निष्पक्ष तपासाची अपेक्षा आहे, जेणेकरून आरोपीला कठोर शिक्षा मिळेल आणि पुन्हा अशी घटना घडणार नाही.